सुस्वागतम.

ज्ञानगंगा (एक शैक्षणिक चळवळ) या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे

माझ्या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत

Sunday, 10 May 2020

आई (एक मायेचा सागर)




              "स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी"

     आई म्हणजे ममता,आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे आई. मायेची पाखरण करणारी एक स्त्री होय.एखादी स्त्री जेव्हा आपल्या  अपत्यास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते. आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची आई बनते. मराठी भाषेतला "आई" हा शब्द मानवी भावनांशी निगडित असून त्यास माणसाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे.आई मायेचा सागर आहे. आई !  आई हा शब्द ऐकला की प्रत्येकाला आठवते ती आपली जन्मदात्री आई! आईची महती एवढी मोठी असते की कितीही सांगा ती अधुरीच! 

" आईची ही माया, शब्दात होणे नाही

आईची ही ममता, शाईही पुरणार नाही 

आईची ही महती,काव्याला पेलणार नाही 

आईचा हा जिव्हाळा, लेखणीला झेपणार नाही"

ईश्वर प्रत्येकाच्या  घरात आईचा रुपाने वास करत असतो.
सर्वजण आईच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात. देवसुद्धा आईच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात. कारण आईच्या कुशीत माया, ममता ,लळा ,जिव्हाळा आणि प्रेम यांचा खजिना असतो, म्हणूनच आईला वात्सल्याचा महासागर म्हटले जाते.आईचं  बाळ कितीही मोठ झाल तरी तिला तो लहानच असतं.म्हणून दूर कामासाठी , नोकरीसाठी गेलेला मुलगा घरी परत आला की आई त्याच्या तोंडावरुन हात फिरवते.त्याला कुरवाळते. आणि आईच्या पाया पडण्यासाठी मुलाने माथा टेकला की आईचा ऊर भरून येते. व ती भरभरून आपल्या मुलाला आशीर्वाद देते. 'सदा सुखी राहा !'बाळ असं म्हणते. केवढी ती माया केवढे ते अफाट प्रेम.आई म्हणजे मंदिराचा उंच  कळस, अंगणातील पवित्र तुळस, भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, वाळवंटात प्याव अस थंड पाणी, आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी पवित्र टाळी, आणी वेदनेनंतरची पहिली आरोळी. आई म्हणजे त्याग मुर्ती स्वतः उपाशी राहून आपल्या पिलास घास भरवते ती आई.खरंच ज्यांना आई असते ते किती नशिबवान असतात. म्हणूनच जोपर्यंत आई  आहे तोपर्यंत जीवनात रस आहे. कारण आईशिवाय जीवन म्हणजे उदास, भकास,भयानक आणि कुरूप आहे. आयुष्यभर आपली काळजी घेणारी आपली आई ही एक त्यागाची मूर्ती आहे. तिचं वर्णन कितीही केलं तरी थोडंच आहे.लेखणीत सामावणार नाही. आई खरंच महान आहे. माझासाठी वंदनीय, पुजनीय आहे. 

"काय सांगू  आई, तुला तुझी ग महती, 

तुझ्यासारखी नाही , कुणीच या जगती.

खरच आई ही आपल्या जीवनात कितीतरी भूमिका पार पाडत असते.  जीवनात डोकावून पाहाल तर त्या व्यक्तीच्या प्रगतीचे श्रेय त्याच्या आईकडेच जाते सुसंस्काराचे घडविणारी मार्गदर्शन करणारी, प्रेम करणारी, माया करणारी, तत्वज्ञान सांगणारी, खडसावणारी, चुका शोधून योग्य दिशा देणारी, मदत करणारी, लक्ष ठेवणारी, काळजी करणारी, जपणारी ती आई अशा कित्येक भूमिका आई पार पाडते. आईची जागा तिच्याशिवाय कोणीच घेवू शकत नाही.आईच्या महती बद्दल आपण ही कथा वाचली असेलच , ती की ठेच लागुन पडलेल्या मुलाला त्याच्या हातात असलेले आईच काळजी देखील विचारते, की बेटा तुला काही लागले तर नाही ना? यावरून आईचे काळीज आपल्या मुलाची किती काळजी घेते तर मग प्रत्यक्ष जीवनातली आई किती श्रेष्ठ असेल याची अनुभूती येते. पुत्र हा कधी ही कूपुत्र होवू शकतो, परंतु आई कधी कूमाता होवू शकत नाही. म्हणूनच म्हटल्या जाते की आईसारखी आईच....!  

     एव्हढ्या दुर जाऊन लोक
     करतात पंढरीची वारी...
     पण आईचे चरण हेच श्रेष्ठ
     माझ्यासाठी पंढरीहुन भारी...

                               ✍️
                 श्री समाधान द.बोरुडे
                   प्राथमिक शिक्षक

No comments: