सुस्वागतम.

ज्ञानगंगा (एक शैक्षणिक चळवळ) या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे

माझ्या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत

Monday, 1 June 2020

माझी_व्यथा...


              एक संघर्षमय बालपणाची कहाणी...

                ९ ऑगस्ट क्रांती दीन, अन् बोरुडे परिवाराचा सुद्धा क्रांती दीन याच दिवशी माझ्या स्वरूपात या परिवाराला वारसदार मिळाला..सर्व कुटुंबात आनंद दरवळत होता...मुलगा म्हटलं की आनंद हा होणारच तब्बेतीन खुप गुबगुबीत व सुदृढ असल्यामुळे सर्वांच्या नजरा भिडत होत्या...लहान बाळ म्हणल्यावर घरात नेहमी आनंदाचे वातावरण राहत असे.मी सर्वांचा लाडका झालो होतो.. जेमतेम एका वर्षाचा असताना, मी नेमकेच पाय टाकायला सुरुवात केली, अन् अचानक मला ताप भरला....ताप खुप भयानक होता कदाचित १०४ डिग्री सेल्सिअस असेल..आई वडीलांना काय करावे ते सुचेना त्यांनी गावात असलेल्या DHMS डॉक्टरला मला दाखविले..त्यांनी मला तपासणी करून दोन्ही साईडला सुई टोचली... अन् थोड्या वेळातच होत्याचे नव्हते झाले..माझ्या दोन्ही पायांनी पाय धरणे सोडून दिले...अचानक माझे दोन्ही पाय लुळे पांगळे झाले...आईने वडिलांनी मला पाहून टाहो फोडायला सुरुवात केली...डॉक्टर सुद्धा भयभीत झाले... आमची परिस्थिती खुप बिकट व मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारी अन् काही दिवसापूर्वीच या गावात वास्तव्याला आलेलो असल्यामुळे वडिलांना तिथे काही अँक्शन घेता आली नाही. जास्त वेळ न लावता मला दुसऱ्या चांगल्या दवाखान्यात दाखल केले..परंतु काहीही उपयोग झाला नाही..ती ताप नसून पोलिओ आजाराची लक्षणे होती...आणि तिथेच घात झाला.. अन् मी कायमचा  अधु झालो...आता माझ्यासोबत जन्माला आलेली मुले रस्त्याने जोरात धावत होती..मला ते सर्व दिसत होते.माझी सुध्दा धावण्याची इच्छा होत होती...परंतु ते शक्य होत नव्हते..पायावर कसल्याच प्रकारे उभे राहता येत नव्हते.दिवस कटत होते तसा मी सुध्दा मोठा होत होतो..आई वडिलांनी मला चांगले करण्यासाठी मोलमजुरी करून अनेक दवाखाने पायाखाली घातले होते.पण गुण काही येत नव्हता. दवाखान्यात गुण येत नसल्यामुळे आता अंधश्रद्ध ने दुसऱ्याच्या सांगण्यावरून वडिलांच्या मनात जागा घेतली होती. अमुक केल्याने बरा होईल तमुक केल्याने बरा होईल तसे अनेक प्रयोग माझ्यावर सुरू झाले..त्यातील एक प्रयोग तर खुप त्रासदायक होता..तो म्हणजे शेळीची विष्ठा असलेली लेंडी खत जिथे टाकल्या जायची त्या ठिकाणी पूर्ण शरीर बसेल असा खड्डा खोदून त्यामध्ये अगदी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नित्यनेमाने १० दिवस पूर्ण मला पुरल्या जायचे.फक्त आणि फक्त माझे डोके तेव्हढे वरी रहायचे.अक्षरशः मला आत मध्ये खुप चटके बसत होते.जोरजोराने रडायला येत होते..माझे रडणे खुप व वेदनादायी असल्यामुळे आई वडिलांना ते बघवत नव्हते..पण हा उपाय केल्यामुळे मी बरा होईल ही अपेक्षा ठेऊन ते होते...इथे सुद्धा त्यांचा अपेक्षा भंग झाला...नंतर आईवडिलांनी खुप देवाच्या वाऱ्या (नवस) केले.. अंबेरी यवतमाळ जिल्ह्यातील ठिकाण या ठिकाणी दररोज मला पाच दिवस दर्शनाला घेऊन जायचे..ते सुद्धा सकाळी सकाळी चार वाजता बाजूला वाहत असलेल्या नदीत थंड पाण्याने अंघोळ घालुन..इथे सुद्धा भ्रमनिरास झाला..आता मी सहा वर्षाचा झालो होतो.. माझ्या शिक्षणाची चिंता आईवडिलांना सतावत होती,मला चालता येत नसल्यामुळे माझे शिक्षण कसे होईल यामुळे ते खुप चिंतेत होते...त्यावर उपाय काढत गावातील जिल्हा परिषद शाळेत माझा प्रवेश नक्की केला. व मला दररोज उचलुन शाळेत नेऊन बसवले व माझ्या शिक्षणाचा श्री गणेशा झाला...लवकरच मी पाटी गिरवायला व अक्षर वाचन करायला सुरुवात केली..आई वडील दोघेही शिक्षित असल्यामुळे त्यांना माझ्या या अभ्यासुवृती कलेचा आनंद झाला..मी थोडासा गुणी तर होतो.पण त्यापेक्षा जास्त अवगुणी होतो. घरापासून शाळेचे अंतर ५०० मीटर एव्हढे होते.ते मी टोंगळ्यावर पार करत घरी येऊ लागलो. ...तिथेच माझ्या जिद्दीची वडीलांना प्रचिती आली ... अन् त्यांनी मुखातून जिद्दी आहेस हा शब्द काढला. वयाचे ९ वर्ष पार केले होते..पायाचे टोंगळे गुडघ्यावर चालू चालू रक्तबंबाळ होत होते..तेंव्हा वडिलांनी मला पुराण्याची (बैल गाडीवर बैलाला टोचण्यासाठी जी काडी असते..) त्या पासून काठी तयार करून दिली.. अन् त्यावर हळू हळू तिचा आधार घेत मी चालायला शिकलो...आता तर मला पाय फुटले होते..नुसते चालणेच नाही तर मी पळायला लागलो होतो...(अर्थात पडत सुद्धा होतो) पण मागे फिरून पाहिले नाही...कारण डर आगे जीत है. काडी मिळाल्या पासून मी घरात कमी आणि खेळायला जास्त जात होतो..चिंचोके,कोई, गोटया,क्रिकेट इत्यादी  हे सर्व खेळ अगदी सर्वांना लाजवेल असे मी खेळत होतो...वडिलांनी हे सर्व हेरले होते...त्यांना माझ्या खेळण्याचे काही वाटत नव्हते पण भविष्याची जास्त चिंता होती...म्हणून त्यांनी मला लवकरच वयाच्या ११ व्या वर्षी स्वतः पासून (काळजावर दगड ठेवून) दूर केले अन् पुढील शिक्षणासाठी औरंगाबाद येठील वसतिगृहात  टाकले....आई वडिलांसाठी ही गोष्ट वेगळीच होती. वसतिगृहात माझ्यासारखी असंख्य मुले पाहून आईच्या डोळ्यातून अश्रु अनावर झाले.पण वडिलांनी आईला हिम्मत देत त्याच्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे..तु तुझे अश्रु अनावर होऊ देऊ नकोस नाहीतर याला घरी परत घेऊन जाऊ..असे शब्द पडताच आईचे रडणे थांबले. तिथे माझ्या सारखेच भरपुर मुले होती.. तिथुनच जवळ असलेल्या महानगर पालिकेच्या शाळेत माझे पाचवीला एडमिशन झाले होते...हॉस्टेल मधून आम्हा सर्व मुलांना गाडीने शाळेत सोडले जायचे..शिक्षण चांगल्या दर्जाचे मिळायला सुरुवात झाली...वसतिगृहात सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे खाण्यापिण्याची काळजी घेत होते.. शिक्षण आणि खेळ यामध्ये आम्ही कधीही माघार घेतली नाही..क्रिकेट तर अगदी आवडीचा खेळ होता.वस्तीगृहाच्या टेरेस वर आमचा क्रिकेट सामना नेहमी रंगायचा..बॅटिंग करत असता लवकर आऊट न होणारा मी, नेहमी जोरात बॉल मारल्याने एखादी कुंडी माझ्याकडून फुटायची.मग मात्र त्या रागाच्या भरात आमच्या वसतीगृहाचा मॉनिटर मला फोडायचा..आमची मस्ती खुप रंगायची अन् मार पण तेव्हढाच भेटायचा... वयचं होते ते..त्या वयात दंगा मस्ती ही आलीच..एक वेळेस तर पलंगावर (कॉट) पकडापकडी खेळ खुप रंगला (जवळपास मोठ्या हॉल मध्ये ४० पलंग असतील )..या वर आमची धावपळ सुरू झाली..एकमेकांना पकडत असताना अचानक माझ्या डोक्याचा भाग पलंगाच्या कोपऱ्यावर धडकला आणि मी खाली बसलो..माझे डोके फुटले होते. डोक्यातुन रक्तस्त्राव सुरु झाला..वसतिगृहाची सिस्टर ने मला ताबडतोब घाटी (औरंगाबाद मधील प्रसिद्ध दवाखाना.) येथे admit केले..माझ्या डोक्यात दोन तीन टाके घालायचे काम पडले..परत येता वेळेस सिस्टर ने माझी चांगली कानउघाडणी केली,तेंव्हापासून माझ्या अतिउत्साही उनाडकीला ब्रेक लागला...माझे खेळणे कमी झाले. शिक्षणात चांगल्या प्रकारे रस निर्माण झाल्यामुळे शाळेत नेहमी चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊ लागलो.सातवी पर्यंत तिथे शिक्षण पूर्ण झाले.अपंग पुनर्वसन अंतर्गत हे वसतिगृह असल्याने वसतिगृहातील अस्थिव्यंग मुलांचे ऑपरेशन करण्याचे अधिक्षक यांनी ठरविले होते..अनेक मुलांचे ऑपरेशन झाले होते..परंतु ऑपरेशन नंतर ते वेदनेने विव्हळत होते.त्यांची ती परिस्थिती बघून वडिलांनी माझे ऑपरेशन न करण्याचे ठरविले... अन् तिथे माझा औरंगाबाद मधील शिक्षणाला बाय बाय झाला...आता आठवीत कुठे शिक्षण घ्यायचे याचा विचार करत असतानाच गावातील वसंतराव नाईक विद्यालय येथील शिक्षकवृंद घरी आले.. अन् गावातीलच शाळेत (विद्यालयात) माझे माध्यमिक शिक्षण सुरू झाले.औरंगाबाद येथून उच्च प्राथमिक शिक्षण पूर्ण करून आल्यामुळे गावातील मुलांनी समोरच्या बेंचवर बसायला जागा दिली..थोडीशी हुशारकीची चुणूक दिसल्यामुळे येथे माझे अनेक मित्र झाले..त्यापैकी,सुनील,किशोर, भिका,प्रकाश हे माझ्या गळ्यातले ताईत झाले.अगदी जीवाला जीव देणारे हे माझे मित्र कोणतेही चांगले वाईट कृत्य करायचे असले की आम्ही सर्व सोबतच असायचो...त्यामुळे शाळेत जर एखादी घटना घडली तर सर्वात पहिले आम्ही जिम्मेदार असायचो..आणि शिक्षकांचे सुद्धा आम्हीच गुन्हेगार असायचो..त्यामुळे सर्वप्रथम शिक्षेला पात्र आम्हीच.एक वेळ असाच एक प्रसंग शाळेत द्वितीय सत्राचे पेपर सुरू झाल्यावर घडला आम्ही त्यावेळेस इयत्ता नववीत होतो.झाले असे की,पेपरचे वेळापत्रक आम्हला मिळाले होते.नियमित वेळापत्रकानुसार पेपर चालू होते..पहिला पेपर मराठी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी इंग्रजी पेपर होणार म्हणून आम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला..परंतु काही कारणामुळे त्या दिवशी शाळेला सुट्टी देण्याचे काम पडले..आमचा पेपर झाला नाही,मात्र आजूबाजूच्या गावात तो पेपर झाला आणि तिथे आमच्या गावातील काही मुले शाळा शिकण्यासाठी जात होते.त्यामुळे त्या पेपर ची प्रश्नपत्रिका आम्हला घरपोच मिळाली अन् प्रश्नपत्रिकाच हातात आली म्हंटल्यावर बाकीच्या मित्रांसाठी ती पर्वणीच ठरली..आता सगळ्यांना पेपरची भीती नाहीशी झाली..आम्ही आनंदात पेपर देण्यासाठी दुसऱ्यादिवशी शाळेत पोहचलो..परिपाठ पूर्ण झाला अन् गुरु ते गुरूच असतात त्यांनी परिपाठ संपल्यावर सूचना दिली आज इंग्रजी पेपर होणार नाही.त्या बदली विज्ञान पेपर होईल..आमचे तर आता धाबेच दणाणले होते..आमच्या आनंदावर विरजण पडले..आम्ही सर्व वर्गात बसलो आणि आमचे खलबत सुरू झाले. अन् विचारविनिमय झाल्यानंतर आज आपण इंग्रजीचा च पेपर द्यायचा दुसरा नाही हे ठरले.शिक्षक विज्ञान चा पेपर घेऊन वर्गात आले मी समोरच्या बेंचवर बसत असल्यामुळे सर्वात पहिले पेपर माझ्या टेबलवर आला अन् ठरल्याप्रमाणे मी पेपर घ्यायला नकार दिला.सरांनी माझ्याकडे पाहून मुखिया बनू नकोस असे उद्गार काढले आणि पुन्हा वर्गात पेपर वाटायला सुरुवात केली थोडा वेळ तर कुणीच पेपर घेतले नाही.सरांनी थोडे वर्गात भीतीदायक वातावरण तयार केल्यानंतर सर्व मुलांनी पेपर घेतले..पण सरांनी मलाच पेपर दिला नाही.इथेच राजकारण काय असते ते कळले तेथुन पुढे मी कधीच असल्या बाबतीत पुढाकार करणार नाही ही शपथ घेतली..तो दिवस माझ्यासाठी खुपचं आठवणीत ला दिवस..ही घटना सरांनी वडिलांना जसाच तशी थोडी तेल मीठ लावून सांगितली त्यामुळे घरातील वातावरण एव्हढे तापले की वडिलांना मला धो धो धोपटले.. अन् माझ्या फिरण्यावर अंकुश आला..हे माझे किशोरवयीन वय होते..त्यामुळे घरात काही मन रमत नव्हतं...असे अनेक प्रसंग आठवणीतले यातच आता मी दहावी उत्तीर्ण झालो... पुन्हा आता एकदा पुढील शिक्षणासाठी कोणता विषय निवडायचा कुठे शिक्षण घ्यायचे हा प्रश्न समोर आला..त्याच उन्हाळ्यातच मोठ्या बहिणीचे लग्न झाले होते.भाऊजी औरंगाबाद येथे राहत असल्यामुळे माझ्या पुढील शिक्षणासाठी मराठवाड्याची राजधानी सज्ज झाली आणि मिलिंद कॉलेज ऑफ सायन्स इथे माझे एडमिशन झाले.कॉलेज खुप मोठे होते ,हा परिसर माझ्यासाठी अनोळखी होता.कॉलेज मध्ये कुणीही ओळखीचे नव्हते.माझा स्वभाव जरा ओळख निर्माण करण्याचा असल्यामुळे मी पाहिले मित्र जोडण्याचे काम केले.तसे मित्र जोडण्यात जास्त वेळ लागला नाही..परंतु भाऊजी जिथे राहत होते तेथुन कॉलेज तीन चार किलोमीटर अंतरावर होते..दररोज रिक्षा करून कॉलेजला जाणारे पडवरणारे नव्हते.सर्व मित्र चालतच हसत खेळत कॉलेजला पोहचायचे.मनात हा प्रश्न नेहमीच आपण चांगले असतो तर मला पण यांच्या सोबत मौज मजा करत जाता आले असते..मात्र मी स्वतःला कमी लेखायचे नाही असे मनात ठरविले आणि मी सुद्धा त्यांच्या सोबत त्यांच्या पाऊलाला पाऊल देत कॉलेज गाठू लागलो..नंतर कधीच स्वतःला कमी लेखल नाही...असे करत करत चांगल्या पद्धतीने ११ वी चे शिक्षण पुर्ण झाले आणि काही कारणास्तव १२ वी शिक्षणासाठी तालुका प्लेस गाठावे लागले... इथे माझा प्रिय मित्र सुनील शिक्षण घेत होता योगायोगाने त्याच्यासोबत रूम पार्टनर म्हणून राहण्याचा योग आला..तो तर माझा दुसरा पायच (माझा आधार) होता.दोघेही सायन्स मध्ये असल्यामुळे चांगल्या पद्धतीने अभ्यास होत होता..थोड्या दिवसातच १२ वी चे पेपर झाले.. अन् आम्ही उत्तीर्ण झालो...
           आता पुढे काय...?

                              क्रमशः